Sunday 18 March 2018

जातीत गुदमरलेला हुंदका .. #cast#जात

आई बापाला जरी मनवलं तरी या समाजाला कसं मनवणार. पोरगी शिकली की हाताबाहेर जाते, बाहेरूनचं एखादं लफडं करून येते. त्यापेक्षा पंधरावी झाली की तिचं लग्न लावून द्यायचं. नसता जीवाला घोर कशाला. नात्यातलं एखादं पोरगं बघायचं आणि उडवायचा बार...
वर्षभरात पाळणा हलतो मग बस सांभाळत खांद्यावर लेकरू. गावात आलीस की बये पंजाबी ड्रेस घाल, लोकं काय म्हणतील. ते जिन्स तिकड कॉलेजकडे घालत जा. शरीरावर जरा मांस वाढलं की पोरीच्या लग्नाची घाई सगळीकडून चालू...
कुणाच्या लग्नात जावं तर बायकांचा गराडा भोवती. कोणा उतावळ्या नवर्याची बहिण येणार आणि शिक्षण विचारणार. लग्नात नटावं तरी टेंशन. कधी संपणार कॉलेज,अजून किती शिकणार. आमच्या पाहण्यात एक मुलगा आहे. चांगला इंजिनियर आहे. जोडा छान दिसेल. घ्या मनावर.
यंदा करायचं नाही म्हणलं तरी जाईपर्यंत, पोरगी मनात बसलीये सांगताच राहणार. या लग्नात पोरींचा बाजार करून टाकतात नुसता. दिसली पोरगी, नाकीडोळी छान वाटली, रंग उजळ दिसला की घाल मागणी...
आम्ही दोघांनी वेगळं होणं हा एकच पर्याय आमच्यासमोर होता. पळून पळून कुठे जाणार, आणि पळायचं तरी कुणापासून. आपल्याच माणसांपासून. लग्न नाही होऊ शकत. घरचे स्वीकारणारच नाहीत. आपली पोरगी कुणा दुसर्या जातीत द्यायची हे सहन तरी कसं होणार. त्याचे घरचे तरी कुठे स्वीकारतील. मी फार लवकर स्वतःला आवरायला हवं होतंं, इतका त्रास झालाच नसता. सगळंच किचकट करून घेतलं...
Image result for जात
https://www.marathislogans.com/jat-pat-toda/ 
गावाकडे आलं तर याचा कॉल घ्यायचा म्हणजे मोठ टेंशन. म्हातार्या बायकांचे कान माझ्याकडेचं. सारखी फोनवरचं असती पोरगी. कुणाशी कुचूकुचू बोलती. रात्री कॉल करावा तर आवाज घुमणार. पोरीला फोन देऊनच चूक केली. सारखं काय त्यावर बोट फिरवत असती. चार दिवस सुट्टीला आली तर घरात लक्ष दे की. एवढ्या काय मैत्रिणी फोन करतात.- आपल्या मुलीला मित्र असूच शकत नाही हे त्यांनी पक्क मनाशी बांधलेलं असतं...
इतक्यात मला लग्न करायचं नाहीच. आधी स्वतःच्या हिंमतीवर कमवायचं आहे. त्याचं देखील हेचं म्हणणं , कशाला लवकर लग्न करायचं. घरचे ऐकणार नाहीतचं त्यामुळे त्यांना सांगून स्वतःच्याच डोक्याला कशाला त्रास करून घ्यायचा. त्यांच्यासाठी पोरगी डोक्यानं लहान पण शरीराने मोठी झालेली असते. तिचे हात पिवळे केले की जबाबरीतून मोकळं. तिला एखादा मित्र आहे, दोघांना स्वतःच्या पायावर उभं राहायचंय मग पुढे ते लग्नाचा विचार करतील , हे इतकं सगळं पचणार तरी आहे का....
आम्ही ठरवलं आहे, जितका वेळ दोघांकडे असेल, सोबत राहायचं. कसला विचार करायचाच नाही. लग्न होणार नाही म्हणून नातं तोडून कशाला टाकायचं. आम्ही सोलमेट आहोत. आलेला दिवस पुढे ढकलायचा. कधी लग्नाचा विषय निघतो आणि त्याच्या डोळ्यात पाणी येतं. हे नातं क्षणभंगुर आहे याची सतत जाणीव होते. मी कुणा दुसर्याची होणार हा विचार नाही करवत त्याला. दोघांचेदेखील हात बांधलेत. कोणता राडा, भांडण आणि मनस्ताप नकोय. ‘प्यार किया तो डरना क्या’ वगैरे म्हणन सोपं आहे. पण किती आयुष्य उध्वस्त होतील.
आधीची पिढी त्यांच्या विचाराने घडली. त्यांना किती समजवणार. ते आलेत त्याचं विचाराने पुढे जाणार. त्यांना वाटलं तर कदाचित मान्य करतीलसुद्धा, पण त्यांनी मान्य करावचं ही जबरदस्ती आम्ही नाही करणार.
हे नातं आम्ही निर्माण केलंय. प्रत्येक क्षण जगलोय. त्याच्या सहवासात मला हलकं वाटतं. भविष्याची स्वप्नं त्याच्या डोळ्यातून पाहते. हातात घेतलेला हात कधीतरी सुटणार याची जाणीव आहे. जुन्या नात्यांना ऑक्सिजन देताना आमच्या नात्याचा मात्र व्हेंटीलेटर काढून टाकण्याचा आम्ही निर्णय घेतलाय.....जातीत गुदमरलेला हुंदका शोधण्यासाठी.




#cast#जात